वर्धा - सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या करंजी (भोगे) जवळील सोंडलापूर शिवारात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. दोघांनी गावठी दारू पिल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोघांचा मृत्यू दारू पिल्याने झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असून शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सोंडलापूर येथील रामा कृष्णा सोयाम (६०) आणि अंकुश रामा सोयाम (२८) या दोन्ही पिता पुत्रांनी गुरुवारी रात्री घरी गावठी दारू आणून सेवन केली. शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पुन्हा दारू पिण्यास सुरूवात केली. मात्र, यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध पडले. गावातील एकाला याची माहिती मिळताच त्यांने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनतर शवविच्छेदन करण्यात आले. रक्ताचे नमुने तसेच विसेरा काढण्यात आला आहे. प्राथमिक अंदाज पाहता या दोघांचाही मृत्यू दारूमुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.