वर्धा - काँग्रेस पक्षाचे इंजिन बंद झाले आहे. पक्षाला एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष असले तरी याचा काहीही फरक पडणार नाही म्हणून सहा लोकांनी मिळून काँग्रेसच्या गाडीला कितीही धक्का दिला तरी ते निवडणूकीत विजयाच्या दिशेने जाऊ शकत नाही, अशी जोरदार टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
काँग्रेसचे गाडीला कितीही धक्का मारला तरी पुढे जाणार नाही - अर्थमंत्री मुनगंटीवार अर्थमंत्री मुनगंटीवार हे काल रविवारी जिल्हा दौऱयावर आले असता खासदार विकास निधी अंतर्गत नगर परिषद माध्यमिक शाळा देवळीच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचासोबत खासदार रामदास तडस, विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर, देवळी येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने कितीही स्वप्न बघितले तरी पुढचा मुख्यमंत्री आमचा होणार आहे. एवढे वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही कोणती विकासकामे केलीत ? जनता तुम्हाला का निवडून देईल, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसने निवडणुकीत फक्त मोदी हटावचा नारा देऊन प्रचार केला. आम्ही देश बचाव, देशाच्या प्रगतीचा नारा देतो. काँग्रेस जनतेपुढे मला पहा फुल वाहा, असे म्हणत गेली तरी जनतेला सर्व माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस आता पुढे जाऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले.
आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, येणारा मुख्यमंत्री महायुतीचा होणार आहे. शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर भाजप सेना यांच्यात विधानसभेसाठी समान वाटप होईल. तसेच जागा वाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करून ठरविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस नाही. धरणे अजूनही कोरडी आहे म्हणून जिथे पाऊस कमी पडला आहे, तिथे शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी विभागाचा अभ्यास सुरू आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्यासाठी मंत्रीमंडळने मंजुरी दिली आहे, असे अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले.