वर्धा : दिवसभर या परिसरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. यात संमेलनाध्यक्षांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन असे कार्यक्रम राहणार आहेत. विविध ठिकाणाहून साहित्यिक, साहित्य रसिक वर्धेत दाखल झाले आहेत. पुढचे तीन दिवस साहित्य नगरीत साहित्याचा जागर होणार आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदिप दाते याच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत. संमेलनाला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज साहित्य संमेलनातील कार्यक्रम : सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे. आचार्य विनोबा भावे सभामंडपात सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन, दुपारी 2.00 वाजता ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद पार पडणार आहे. दुपारी 4.30 वाजता संमेलनाध्यक्षांचे भाषण पार पडणार आहे. सायं. 5.30 वाजता ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ वर परिसंवाद पार पडणार आहे. सायं. 7.00 वाजता ‘ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रिय’वर परिसंवाद, रात्री 8.30 वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन असणार आहे.
वर्धेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद :साहित्य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. समारोप रविवार 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व प्रकाशक राजीव बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती, डॉ. पी. डी. पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी, सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
इतर कार्यक्रम : दुपारी 2.00 वाजता कविकट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन प्रा. देविदास सोटे करणार आहेत. दुपारी 2.00 वाजता गझल कट्टयाचे उद्घाटन कविवर्य सुरेश भट करणार आहेत. दुपारी 4.00 वाजता ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचचे उद्घाटन करणार आहेत. मनोहर म्हैसाळकर सभामंडपात दुपारी 2.00 वाजता कथाकथन पार पडेल. सायंकाळी 6.30 वाजता ‘विदर्भातील बोलीभाषा’ वर परिसंवाद, सायंकाळी 8.00 वाजता ‘मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा’ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.