वर्धा - निर्भयाच्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशी देण्याऐवजी तारखेवर तारीख दिली जात आहे. मात्र, हिंगणघाट येथील घटनेचा आरोपी विकी नगराळे याला कुठलीही दिरंगाई न करता तत्काळ फासावर लटकवा, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत.
निर्भयासारखी तारीखवर तारीख नको, नराधमाला तत्काळ फासावर लटकवा; संतप्त नागरिकांची मागणी - हिंगणघाट जळीतकांड
निर्भयाच्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशी देण्याऐवजी तारखेवर तारीख दिली जात आहे. मात्र, हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कुठलीही दिरंगाई न करता फाशी द्यावी, अशी मागणी हिंगणघाटच्या नागरिकांनी केली आहे.
न्यायासाठी आम्ही लढतो आहे. जलद गती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशी व्हावी. निर्भया प्रकरणासारखी या प्रकरणाला स्थगिती मिळाली, तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
शिक्षिका महाविद्यालयामध्ये जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या पीडितेला उपचारासाठी नागपूर शहरातील 'ऑरेंज सिटी' रुग्णालयात हलवण्यात आले. आज हृदयविकाराचा धक्का आल्याने पीडितेची प्रकृती खालावली होती. त्यानंतर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हिंगणघाट परीसरात बंद पाळण्यात आला आहे. यानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या