वर्धा - जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लागलेल्या आगीत सीसीटीव्ही कंट्रोल युनिट रुम जळून खाक झाल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. यामुळे पोलिसांचा तिसरा डोळा समजणारी सीसीटीव्ही यंत्रणा युनिट जळल्याने बंद पडली. अग्निशामक दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी साधारण 35 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वर्ध्यात पोलिसांचा 'तिसरा डोळा' पडला बंद, सीसीटीव्हीचे कंट्रोल युनिट जळून खाक पोलीस अधीक्षक कार्यलयात लागलेल्या आगीत अचानक धूर निघू लागला आणि सर्वत्र खळबळ उडाली. पोलीस यंत्रणेचा तिसरा डोळा म्हणून सेवा देणारी सीसीटीव्हीचे मॉनिटर करणारे कंट्रोल युनिट पूर्णतः जळून खाक झाले. यामध्ये सर्व्हर, एलसीसीडी स्क्रिन कॉम्प्युटर, फर्निचर आदी साहित्याचा समावेश आहे. यासह शहरावर नजर ठेवणारी यंत्रणा आणि गरज पडल्यास लाऊड स्पीकरवर संदेश देणारी पीए सिस्टम सुद्धा बंद पडली आहे. लागलेली आग लगतच्या नियंत्रण कक्षात पोहोचली असून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवत काही साहित्य वाचवण्यात आले. यात 100 नंबर बंद पडलेली नियंत्रण कक्षाची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
महिला कर्मचाऱ्यांचे 20 हजार रुपये जळता जळता वाचलेयामध्ये कक्षात कार्यरत असलेली महिला कर्मचाऱ्याने काही कामानिमित्त 20 हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढून आणले होते. यावेळी आग लागली असता महिला कर्मचारी घाबरून बाहेर आली. पण हिम्मत करत तिने ती पैशांची बॅग बाहेर काढल्याने सुदैवाने पैसे वाचले.यामध्ये ही कंट्रोल युनिट जळाली आहे. साधारण 35 लाखाच्या घरात प्राथमिक नुकसानीचा अंदाज आहे. लवकरच ही सिस्टम पुन्हा तयार करून सुरू होईल त्यासाठी संबंधित कंपनीला सांगण्यात आले असल्याचेही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी सांगितले.