वर्धा- पक्षांतर करणारे लोक मोठ्या प्रमणात इकडून तिकडे जात आहेत. त्यांना मतदार जनतेने लाथाडले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे 5 वर्षे विरोधीपक्ष नेते राहिले. त्यानंतर जर काँग्रेसचा विरोधीपक्ष नेताच काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात असेल, तर आता काँग्रेस पक्ष संपवून मोदींच्या नेतृत्वात सामील करून टाकला पाहिजे. तसेच त्यामध्ये राहुल गांधींनासुद्धा घेतले पाहिजे, जेणेकरून दुसरा पक्षच राहणार नाही, अशी उपहासात्मक टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.
पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना जनतेने लाथाडले पाहिजे प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडून वर्ध्यात शेतकऱ्यांसाठी आयोजित जेलभरो आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीकडून जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलाना आंबेडकर पुतळ्यापासून सुरूवात झाली. त्यानंतर आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी पुढे बोलताना कडू म्हणाले, की सरकारने जे कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. ते आता पुर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांनी दीड लाखाच्यावरील रक्कम भरली. मात्र, तरीही कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही, याचे मुख्यंमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. सरकारने काही ठराविक तालुक्यांना दुष्काळ निधी दिला नाही. लोक अजूनही दुष्काळ निधीच्या प्रतिक्षेत आहेत. त्याबरोबरच ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.
यावेळी आंदोलनात प्रहार पक्षाचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे, जिल्हा प्रमुख विकास दांडगे, राजेश सावरकर, विवेक ठाकरे, संदीप उमक, मिलिंद गव्हाळे, भानुदास सोमानाथे, भूषण येलेकार, रोषण दाभाडे, आदित्य कोकडवार उपस्थित होते.