वर्धा - वर्धा जिल्हा रुग्णालयासमोर एका तरुणाचा मृददेह आढळला होता. या हत्ये प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. १४ एप्रिलपासून बेपत्ता असलेला विकास पांडेचे मृतदेह अखेर १८ एप्रिलला आढळून आले. अवघ्या ८ हजारासाठी ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शव विच्छेदनानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सलीम पठाण (वय २०) आणि एका अल्पवयीन आरोपीस अटक केली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात एका गटारात मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली. मात्र हत्या का आणि कशामुळे झाली हे स्पष्ट झाले नव्हते. शवविच्छेदनाच्या अहवालात त्याचा छातीवर जबर मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. विकास हा दारू पिण्याचा व्यसनाधीन होता. तो १४ एप्रिलला रॅलीत सहभागी होता. त्यावेळी त्याच्याजवळ पैसे होते. पोलिसांनी तपास सुरू केला मात्र सुगावा लागत नव्हता. अखेर सीसीटीव्हीमध्ये दोन संशयित आढळून आले. इथूनच तपासला दिशा मिळाली. सलीम पठाण हा सराईत गुन्हेगार होता. तो इतवारी परिसरात दारुच्या नशेत असणाऱ्यांच्या खिशातील पैसे काढून घेत असे. विशेष म्हणजे याबाबत तक्रार होत नसल्याने अनेक वर्षांपासून त्याचा गुन्हेगारी प्रकार असाच सुरू असायचा. १४ एप्रिलला हाच प्रकार विकास पांडे सोबत त्याने केला होता.