वर्धा- काळ्या घोड्याच्या नावाने शहरातील लोकांची फसवणूक करणाऱ्या लोकांचा अंनिसने भांडाफोड केला. त्यानंतर त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याविरोधात जादूटोणा कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईबद्दल माहिती देताना अंनिसचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारी रामू सागर असे आरोपीचे नाव आहे. तो मध्यप्रदेशातील भोपाळचा रहिवासी आहे. काळ्या घोड्याची नाल आणि अंगठीची विक्री करण्यासाठी तो त्याच्या साथीदारांसह शहरात आला होता. विशेष म्हणजे त्याने जुन्या घोडा गाडीसोबत सोबत ४ काळे घोडे सुद्धा आणले होते. काळ्या घोड्याच्या नालपासून अंगठ्या तयार केल्या जातात. या बोटात धारण केल्याने घरातील कौटुंबिक वाद, संकटे दूर होत असल्याचा दावा तो करीत होता. एवढेच नाहीतर कुणाला मुल होत नसेल तर त्यांनाही याचा फायदा होतो असा खोटे दावाही त्यानी केला.
सर्वप्रकार भोंदुगिरी आणि अंधश्रद्धा पसरवणारा असल्याची माहिती अखिल भारतीय अनिसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. पंकज वंजारी, पराग दांडगे यांनी शहरात शोध घेत शहर पोलिसांकडे त्यांना सोपवले. तो खोटी बतावणी करून नागरिकांना गंडा घालत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात आला. मात्र, अल्पवयीन असल्याने त्यांना सोडण्यात आले.
घोड्याच्या टाचेचे संरक्षण करण्यासाठी लोखंडापासून ही नाल तयार केली जाते. नालेपासून मानवाला कुठलीही सुरक्षितता मिळू शकत नाही. नाल दारावर लावल्याने संकट , अतेंद्रीय आणि अनिष्ट शक्तिंपासून वाचता आले असते. किंवा भरपूर संपत्ती घरी आली असती, तर हे लोक नाल आणि अंगठी घेऊन रस्त्यावर कशाला विकत बसले असते? असा सवाल अंनिसचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारी यांनी केला. याचाच विचार समाजाने करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.