वर्धा - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारू विक्रेते सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. पोलिसांनी धडक मोहीम राबवत 16 हजार 400 लिटर मोहाच्या दारूचा सडवा नष्ट केला. हा साधारण 12 लाखांचा मुद्देमाल होता.
अवैध दारू निर्मिती अड्ड्याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले यांनी कारवाईला सुरूवात केली. त्यांनी सावळापूर, लहादेवी, हरदोली शिवारातील जमिनीखाली दडपून ठेवलेला दारूचा सडवा शोधून काढला.
जंगल शिवारातील राहुल मेश्राम, गौतम चंदनखेडे, नंदू मेश्राम आणि प्रकाश मेश्राम यांचे गावठी दारू निर्मितीची ठिकाणं नष्ट केली. यामध्ये एका ठिकाणी 4 हजार लिटर सडवा असलेले नंदू मेश्रामचे 20 लोखंडी ड्रम, गौतम चंदनखेडेचे 12 ड्रम (2 हजार 400 लिटर), राहुल मेश्राम याचे 40 ड्रम (8 हजार लिटर), प्रकाश मेश्रामचे 10 ड्रम (2 हजार लिटर) असा एकूण 16 हजार 400 लिटरचा दारू सडवा नष्ट करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस अधिक्षक प्रदीप मैराळे यांच्या नेतृत्त्वात, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलीस कर्मचारी अमित जुवारे, राजेश राठोड, अनिल राऊत, विकास कोकाडे, अतुल भोयर, अमोल अलवीटकर, चंदू वाडवे, प्रदीप दातरकर, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कोरोना लॉकडाऊनच्या काळातही तळीराम मोठ्या प्रमाणात दारू पिण्यासाठी गर्दी करतात. मात्र, आता दारू तयार होण्यापूर्वीच नष्ट झाल्याने दारू विक्रीला आला बसला.