वर्धा- वर्ध्यातील तापमानात कमालीची वाढ होत असून आज तापमानाने पंचेचाळीशी गाठली आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातच तापमान ४५.५ अंशावर पोहोचल्याने मे महिन्यात ते आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
विदर्भात तापमान सर्वाधिक असतेच. तसेच मे महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होते. परंतु यावर्षी मात्र चक्क एप्रिल महिन्यातच तापमानाने उग्र रूप धारण केले आहे. या उष्ण वातावरणाने सर्व सामान्य नागरिकांचे जीवनमान चांगलेच विस्कळीत केले आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दी विरळ होत चालली आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यात काम संपविण्याचा कल दिसू लागला आहे. असे असले तरी बाहेर पडताना उन्हाचा तडाखा बसू नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
थंड पेय घेण्याकडे नागरिकांची धाव
तापमान वाढत चालल्याने थंड पाणी आणि थंड पेय घेण्याकडे नागरिकांची धाव आहे. लिंबु शरबत असो की उसाचा रस वा फळांचा रस लोक आवर्जून पिताना दिसत आहे. उन्हाने नागरिकांची लाही लाही होत असताना पशु-पक्षांना याचा भयंकर फटका बसत आहे.