वर्धा - लोकसभेच्या महासंग्रामत वर्ध्यात आता १४ उमेदवार असणार हे आता निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात माघार घेण्याचा अखेरचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत दोघांनी माघार घेतली. तर उर्वरित १४ जणांना पसंतीनुसार चिन्हांचे वाटप झाले आहे. अंतिम मान्यतेकरता नावाची यादी आणि चिन्हाची माहिती निवडणूक आयोग कार्यालय, मुंबईला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.
भिमनवार यांनी सांगितले, की १४ जणांच्या यादीमध्ये ३ राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत. काँग्रेस, भाजप आणि बसप यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह दिले जातात. याव्यतिरीक्त इतर ५ राजकीय पक्षच्या उमेदवारांना चिन्ह वाटप करताना एकच चिन्हाची २ उमेदवारांनी मागणी केली. बहुजन वंचित आघाडीचे धनराज वंजारी आणि आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टीचे प्रवीण गाढवे यांनी कपबशी या एकाच चिन्हाची मागणी केली. यात ईश्वर चिठ्ठीने प्रवीण गाढवे हे चिन्ह मिळवण्यात विजयी ठरले. उर्वरित उमेदवारांना पसंती क्रमाने चिन्ह देण्यात आले. या चिन्हांची अंतिम मान्यता निवडणूक आयोग कार्यालय, मुंबई येथून मिळताच पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.