वर्धा - उभ्या असलेल्या एसटी बसला कारने मागून जोरदार धडक दिल्याची घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नारायणपूर शिवारात घडली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला आहे. शेख इब्राहिम असे जखमी चालकाचे नाव आहे. धडक दिलेल्या कारमधून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत होती. अपघातानंतर जखमींना मदत करायला ३ जण आले तर दारू पळवून नेण्यासाठी १०० जणांनी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
नागपूर येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बस क्रमांक (एमएच ४० ऐक्यु ६३९४) बसचा टायर पंक्चर झाला होता. नारायणपूर शिवारात टायर बदलण्यास बस उभी केली होती. दरम्यान नागपूर येथून चंद्रपूरला अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारने (एमएच ३१ ईयु ४६७२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये कारचालक इब्राहिम शेख जखमी झाला आहे. जखमी चालकाला उपचारासाठी सेवाग्रामला रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.