मुंबई - महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी सनदी अधिकारी बनावे आणि मुंबई पालिकेचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. महानगरपालिका माध्यमिक शालांत (दहावीच्या) परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सत्कार भायखळा येथील महापौर निवासस्थानी गुरुवारी करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकारात्मक विचारांची लोक एकत्रित आल्यानंतर काय होऊ शकते, याचा परिपाक म्हणजे हा निकाल आहे. या निकालासाठी सातत्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी त्यांचेही अभिनंदन केले. महानगरपालिका शिक्षणावर जितका पैसा खर्च करते, तितका खर्च जगातील इतर कोणतीही महानगरपालिका खर्च करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
गरीब कुटुंबातील मुले महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेतात. माझे शालेय शिक्षणसुद्धा महापालिका शाळांमध्ये झाले आहे. मला त्याचा अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळेच महानगरपालिकेला मानांकन मिळाले आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांचे आभार मानते. महानगरपालिकेच्या अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण 218 माध्यमिक शाळांमधून मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेकरिता 13 हजार 637 विद्यार्थ्यांपैकी 12 हजार 716 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई मनपा शाळांचा दहावीचा यंदाचा निकाल 93.25 टक्के लागला आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विलेपार्ले मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेमधून 96 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणारी कुमारी महेक इलेशकुमार गांधी, प्रभादेवी मनपा माध्यमिक शाळेतून 95.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविणारी कुमारी हिना अर्जुन तुळसकर आणि सांताक्रुझ (पश्चिम) मनपा माध्यमिक (उर्दू) शाळेतून 94.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविणारी कुलसूम तारीक या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते शब्दकोश, भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.