मुंबई - कोरोना आणि त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीला बसला आहे. मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळात अद्यापही लाखो उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहावीच्या तब्बल १६ टक्के आणि बारावीचे २० टक्के पेपर अद्यापही तपासले गेले नसून ते मॉडरेटरकडेच असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगवे यांनी आज दिली. उत्तरपत्रिका तपासण्याच्या विलंबामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष सांगवे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली. मुंबई आणि उपनगरात तब्बल ६० टक्केहून अधिक मॉडरेटर राहतात. लॉकडाऊनच्या अडचणीमुळे आतापर्यंत मुंबई विभागात दहावीच्या ८४ टक्के, तर बारावीच्या ८० टक्के उत्तरपत्रिका या तपासून जमा झाल्या आहेत, तर मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिका तपासण्याचे काम शिल्लक असून अनेकांकडून त्या उत्तरपत्रिका जमा करण्याचे काम अर्धवट राहिले. त्यामुळे आम्ही १५ आणि १६ जून रोजी मुंबईतील विविध परीक्षा केंद्रांवर जाणार असून संबंधित मॉडरेटरकडून त्या उत्तरपत्रिका जमा करणार असल्याचे सांगवे यांनी सांगितले. यासाठी मॉडरेटर आणि शाळांनीही सहकार्य करावे, असे आवाहन सांगवे यांनी केले.