पणजी - गोव्यात एका दिवसात 1440 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी कोरोना बाधित रुग्णाची संख्या 10 हजार 228 झाली आहे. मागील 24 तासांत 21 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 964वर पोहोचला आहे. तर 461 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 84.50 टक्के झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात रात्रीची संचारबंदी
कोविड संक्रमण रोखण्यासाठी गोवा सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. ऑक्सिजन उत्पादकांना औषधी ऑक्सिजन उत्पादित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरण वाढविण्यात आले आहे. सोबतच बुधवारपासून 30 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 या काळात नाइट कर्फ्यू आणि अन्य निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मडगाव, वास्को भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक
आज दिवसभरात 3906 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये 1440 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 6 लाख 6 हजार 325 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर 72 हजार 224 संक्रमित रुग्ण सापडले आहेत. त्यामधील 61 हजार 32 बरे होऊन घरी गेले आहेत. मडगाव, वास्को, माजी, कांदोळी या भागात सध्या मोठ्याप्रमाणात कोविड संक्रमित सापडत आहेत. लसीचे आतापर्यंत 2 लाख 72 हजार 967 डोस देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2 लाख 16 हजार 270 जणांना पहिला तर 56 हजार 697 जणांचा दूसरा डोस पूर्ण झाला आहे.
केंद सरकारडे तीन टन ऑक्सिजनची मागणी
गोवा सरकारने केंद सरकारडे तीन टन ऑक्सिजनची मागणी करण्यात आली होती. त्यांची पूर्तता करण्यात आल्याबद्दल गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पंतप्रधान कार्यालय आणि जेएसडब्लू समुहाचे आभार मानले आहेत. तसेच रात्री त्यांनी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथील या यंत्रणेची पाहणी केली.
सरकार 15 लाख डोस लस खरेदी करणार
गोमंतकीयांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गोवा सरकार 15 लाख डोस लस खरेदी करणार आहे. त्यासाठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. याबाबत त्यांनी एक ट्वीटही केले आहे. ही लस थेट औषध निर्मात्यांकडून खरेदी करण्यात येणार असून 18 ते 45 वयोगटातील सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात येईल. दरम्यान, डॉ. सावंत यांनी आज साखळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे.