पणजी (गोवा) - ब्लॅक फंगसचे गोवा राज्यात आतापर्यंत 10 सक्रिय रुग्ण सापडल्याची माहिती गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे. तर 6 जणांवर उपचार चालू आहेत आणि 3 जण उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत. एका रुग्णाचा ब्लॅक फंगसने मृत्यू झाला असल्याचेही ते म्हणाले आहेत.
गोव्यात 'ब्लॅक फंगस’चे 10 रुग्ण, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांची माहिती
ब्लॅक फंगसचे गोवा राज्यात आतापर्यंत 10 सक्रिय रुग्ण सापडल्याची माहिती गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.
ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचारासाठी वेगळा विभाग
गोमेकॉत ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येतात आणि तशी व्यवस्था येथे करण्यात आल्याचे डॉ. बांदेकर यांनी नमूद केले. गोमेकॉत त्यासाठी वेगळा विभाग करण्यात आल्याचे ते म्हणाले. उपचाराअंती ते रुग्ण बरे होतात, असे त्यांनी सांगितले. मार्चपासून आतापर्यंत म्हणजे गेल्या तीन महिन्यात 0 ते 17 वयोगटातील सुमारे 16426 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यातील 150 जणांना हॉस्पिटलात दाखल करावे लागल्याची माहिती डॉ. बांदेकर यांनी दिली.
तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी गोवा तयार
तिसऱ्या कोरोना लाटेत 2 टक्के गंभीर रुग्ण मिळू शकतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 30 बेडचा आयसीयू विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून गोमेकॉतील त्या वॉर्डात गंभीर रुग्णांवर उपचार होतील, तर कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर दोन्ही जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार करण्याची योजना आखण्यात आल्याचे डॉ. बांदेकर म्हणाले. तर राज्यात 45 वर्षावरील अनेकजण अजूनही लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. त्याचे डोस शिल्लक असून ते देण्यासाठी तसेच ‘टिका’ उत्सवाचा पाठपुरावा म्हणून 45 वर्षावरील लोकांसाठी पुन्हा एकदा खास मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील 164 पंचायतीत ती मोहीम सुमारे 10 दिवस चालणार असून 45 वर्षावरील सर्वांनी न घाबरता लसी घेण्यासाठी पुढे यावे आणि ती टोचून घ्यावी, असे आवाहन डॉ. बांदेकर यांनी केले.
पंचेचाळीस वर्षांवरील लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावे
कोरोनाला रोखण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून लसीकरण महत्वाचे आहे. म्हणून गोव्यातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे. गैरसमजामुळे अनेकजण अजूनही त्यासाठी पुढे येत नाहीत. गोव्यात अजुनही 45 वर्षावरील लोकांसाठी डोस शिल्लक आहेत. ते घेणे महत्वाचे असल्याचे डॉ. बांदेकर म्हणाले.