ठाणे- मुंब्र्यात वाहतूक कारवाई दरम्यान युवकाने जोरदार धिंगाणा घातल्याची घटना घडली. यावेळी त्याने वाहतूक पोलिसांना मारहाणदेखील केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार आहे. अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरेशी व फैजान शेख असे त्या मुजोर युवकांची नावे आहेत.
मुंब्र्यातील काही मुजोर युवक वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुंब्रा वाहतूक विभागाच्यावतीने वाहतूक कारवाई करण्यात येत होती. यावेळी काही युवक व एका महिलेने जबरदस्त राडा सुरू केला. मुंब्रा येथील कन्व्हर नगर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांच्या वाहतूक कारवाईदरम्यान पकडलेल्या दुचाकी स्वारांनी राडा करण्यास सुरुवात केली. आपले लायसन का घेतले? असा जाब विचारत या युवकांनी उपस्थित वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी मोठा जमाव गोळा झाला होता. त्यानंतर काही वेळात या युवकांची मजल या वाहतूक पोलिसांना मारण्यापर्यंत गेली.