नवी मुंबई - बॅडमिंटनचा कॉक काढण्यासाठी घराच्या छतावर चढलेल्या मुलाला उघड्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून यात त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिलिंद प्रल्हाद यादव (वय १३) असे या मुलाचे नाव आहे.
हेही वाचा -धक्कादायक ! मुल नको म्हणून गरोदर पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलले
नवी मुंबई परिसरातील पावणे या गावात मिलिंद यादव राहत होता. तो आठवीत शिकत होता. मिलिंद आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचा कॉक हा घराच्या पत्र्यावर अडकल्याने मिलिंद तो कॉक काढण्यासाठी घराच्या छतावर चढला असता छतावर असणाऱ्या उघड्या विद्युत वाहिनीचा त्याला शॉक लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेबाबत महावितरणाचे कनिष्ठ अभियंता दीपक जाधव यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. जिन्यावरून मिलिंद चढत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा मृत्यू नेमका कशाने झाला आहे, त्याचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे