ठाणे- मंदिराच्या समोर हार फुल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा मुसळधार पावसामुळे विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरमधील सी ब्लॉक परिसरात घडली आहे. मनीष चौहान असे विजेचा तारांचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
उल्हासनगरमधील सी ब्लॉक परिसरात एका मंदिराबाहेर मनीषचा हार फुल विक्रीचा व्यवसाय होता. मात्र, आज सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील सखलभागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. त्यामुळे मृत मनीष हा हार फुल विक्री करत असलेल्या ठिकाणी पाणी कुठून येते, हे बघण्यासाठी तो शेजारीच असलेल्या मंदिराच्या पत्र्याच्या शेडवर चढला. यावेळी उच्च दाबाच्या विजेच्या तारांच्या संपर्कात तो आला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.