ठाणे - लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. अशीच साथ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. यावेळी त्यांनी तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल, अशी मला खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले. पवार ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांच्या जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते.
तुमचा 'हा' प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल - शरद पवार हेही वाचा -' लढ म्हणणाऱ्या पवारांनी एकदा मर म्हटले तर मी मरेन'
पवार म्हणाले की, जिथे कर्तुत्व असते, त्या कर्तुत्वाला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्नाची सोडवणूक करणारे नेतृत्व उभे राहू शकते. आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिले आहे. मागील अनेक वर्षे ठाण्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जे योग्य असेल त्याचा आव्हाड यांनी नेहमीच पुरस्कार केला. यातून स्वतःचे एक स्थानही त्यांनी प्रस्थापित केले आहे.
हेही वाचा -'शिवभोजन थाळी योजना ही क्रांतिकारी सुरुवात'
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वतःचे कर्तुत्व असलेले लोक मंत्री झाले. ठाणेकरांना असे दोन मंत्री मिळाले. त्या दोघांच्या कामातून महाराष्ट्र बदलेल असेही पवारांनी नमूद केले.
लोकप्रतिनिधी जागृक असला तर काय होतं कळवा मुंब्रामध्ये पाहा
शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे भरभरुन कौतुक केले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी जागृक असला आणि त्याला जनतेने साथ दिली तर काय होऊ शकते हे तुम्ही कळवा-मुंब्रामध्ये जाऊन पाहा, असे आम्ही नव्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. म्हणून तुम्हा सर्वांची साथ त्यांच्यासोबत अशीच ठेवा. मी तुम्हाला खात्री देतो की हा तुमचा प्रतिनिधी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांच्या जीवनातही बदल करण्यात यशस्वी होईल. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्याचा तुम्हा सर्वांना सार्थ अभिमान असेल, याचीही मला खात्री आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी मला भाषण झाल्यावर बोलावून घेतले आणि विचारपूस केली. त्यांनीच मला मोठे केले, असे सांगत शरद पवार यांनी आपली एक आठवणही सांगितली. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी मला एका ठिकाणी भाषण करताना ऐकले. भाषणानंतर त्यांनी मला बोलावून घेत माहिती घेतली. तेव्हापासून मी मोठा होत गेलो. बाळासाहेब ठाकरे यांनीही मला साथ दिल्याचे पवार म्हणाले.