ठाणे- लोकलमध्ये दार अडवणाऱ्या टवाळखोर ग्रुपच्या प्रवाशांमुळे एक तरुण धावत्या लोकलमधून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना डोंबिवलीत घडली. विशाल गुरव असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लोकलमध्ये जागा आणि दरवाजा अडवून ठेवणाऱ्या टवाळखोर प्रवाशाच्या ग्रुपवर रेल्वे पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, जेणेकरून दुसऱ्या प्रवाशांचा जीव वाचेल, अशी मागणीही जखमी गुरव यांनी केली आहे.
लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी हेही वाचा -महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही - जितेंद्र आव्हाड
डोंबिवलीत राहणारे विशाल गुरव हे विद्याविहार येथील एका खासगी कंपनीत काम करतात. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकातून सीएसीएमटी लोकल त्यांनी पकडली. एकीकडे सकाळची गर्दी आणि दुसरीकडे लोकलचे दरवाजे अडवून काही प्रवाशी उभे होते. लोकल सीएसीएमटीच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे विशाल गुरव हे लोकलच्या आत शिरू शकला नाही. त्यातच कोपर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी गुरव हे धावत्या लोकलमधून खाली पडले. या अपघातात त्याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा - बँकेत नोकरी, म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून ९ जणांना लाखोंचा गंडा, आरोपीला अटक
लोकलमध्ये दार अडवणाऱ्या प्रवाशांमुळे हा अपघात झाला असून सुदैवाने विशाल गुरव यांचा जीव वाचला आहे. मात्र, यापुढे दुसऱ्या कुठल्या प्रवाशाचा जीव जाऊ नये, यासाठी लोकलमध्ये ग्रुपीझम करणाऱ्या टवाळखोर प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी गुरवने केली आहे. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी कॅमरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.