ठाण्यात स्लॅब कोसळून तरूणाचा मृत्यु ठाणेYoung Man Killed : घरात गणपती असल्यानं अंगणात झाडू मारत असतानाच घराच्या स्लॅबचा मलबा अंगावर कोसळून तरुण ठार झाल्याची घटना घडलीय. ही घटना शहापूर शहरा लगतच्या गंगारोड भागातील घरानजीक रविवारी सकाळच्या सुमारास घडलीय. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केलाय. सुनील बुधाजी खंबायत (वय ३३) असं अंगावर मलबा पडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर घरात गणपती आणि अंगणात मुलाचा मृत्यू पाहून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
धोकादायक स्थितीत नव्यानं स्लॅबचे बांधकाम : शहापूर तालुक्यात शनिवारपासून पाऊस सतत सुरु आहे. जोरदार पावसामुळं ऐन गणेशोत्सवात जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच खालच्या बाजूनं कुठलाही आधार न देता निव्वळ घराच्या भिंतीच्या आधाराने धोकादायक स्थितीत नव्यानं स्लॅबचे बांधकाम करण्यात आलं होतं. त्यातच मृतक सुनीलच्या घरात गणपती आहेत. त्यामुळं तो रविवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घराबाहेरच्या अंगण परिसराची झाडून साफसफाई करीत होता.
उपचारादरम्यान झाला मृत्यू :त्याचवेळी निव्वळ भिंतीच्या आधारानं बांधलेला स्लॅबचा मलबा त्याच्या अंगावर कोसळला. त्याखाली तो दबला गेल्यानं गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेतच कुटुंबीय व शेजाऱ्यांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळं ऐन गणपतीच्या काळातच खंबायत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शहापूर शहरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जातेय. (young man killed Due to house slab falling)
शहापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद : दरम्यान या संदर्भात शहापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्याशी संपर्क साधला असता, मृतक सुनीलच्या घरी गणपती असल्यानं तो घराबाहेरील अंगणात झाडूनं साफसफाई करीत होता. त्याच सुमाराला त्याच्या अंगावर नव्यानं बांधलेला स्लॅबचा मलबा त्याच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
हेही वाचा :
- जळगावात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; भीषण अपघातात तीन तरुण ठार
- Rahuri Crime : गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू; हत्या की आत्महत्या? तपास सुरू
- भुसावळात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार; महामार्गावर अपघातांचे सत्र कायम