ठाणे -ज्या स्मशानात पूर्वी महिलांना जाण्यास भीती वाटत होती त्याच स्मशानात पंचवीस वर्षापासून एका महिलेने आतापर्यंत हजारो मृतदेहांची राख सावरुन तिने आपला संसार सावरला आहे. विशेष म्हणजे जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव केला जातो. मात्र 'ईटीव्ही भारत'ने एक अशा महिलेचा खडतर आणि तितकाच कौतुकास्पद जीवनपट जगासमोर आणला आहे. निर्मला भीमोरे (वय 50) असे या महिलेचे नाव असून ती कल्याण पश्चिम परिसरातील लालचौकी येथील वैकुंठ भूमीत नित्यनियमाने गेली पंचवीस वर्ष विना मोबदला सेवा देत आहे.
हजारो मृतदेहांची राख सावरुन 'तिने' सावरला संसार.. हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे राख व अस्थी गोळा करण्याचे काम.
हे ही वाचा - कोरोनामुळे नाशिकमध्ये होणारे मराठी साहित्य संमेलन स्थगित
निर्मला हा मूळचा वसईच्या राहणाऱ्या असून त्यांचा विवाह 35 वर्षांपूर्वी नागपूरचे रहिवासी असलेल्या व्यक्तीसोबत झाला. त्याकाळी केवळ पतीस हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे राख व अस्थी गोळा करून संबंधित प्रेताच्या नातेवाईकांना देऊन त्या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावर संसाराचा गाडा चालवत होते. निर्मला यांना एकच मुलगी असून ती पाच वर्षाची असताना पतीसोबत निर्मलाही राख व अस्थी गोळा करण्याच्या कामात हातभार लावत होती. कालांतराने पतीची तब्येत खालावल्याने गेल्या पंधरा वर्षापासून मग त्या एकट्याच राख व अस्थी देण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे याच कामातून मिळणाऱ्या मोबदल्यात त्यांनी मुलीचे शिक्षण करून तिचा विवाह करून देण्यात आल्याचे सांगितले. तर पतीचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे आता तर एकट्याच पहाटे लवकर उठून घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले स्मशान पायीच गाठत सर्वात आधी येथील साफसफाई करतात. त्यानंतर अंत्यविधी झालेल्या प्रेतांचे नातेवाईक येऊन त्यांच्याकडून अस्थी घेऊन जातात.
कोरोनाच्या काळात कमी मृतदेह अंत्यविधीसाठी..
हे ही वाचा - महिला दिन विशेष : 'ऑटो आय केअर' ॲपची मोहीम; महिलांना मिळणार फ्री ‘रोड साईड असिस्टन्स’
कोरोनाच्या काळात खूप कमी प्रेत अंत्यविधीसाठी येत होते. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी दिवसाला एक किंवा दोन प्रेत लाकडाच्या सरणावर जाळले जात होते. त्यातून शंभर ते दीडशे रुपये राख व अस्थी दिल्यानंतर मिळायचे, मात्र पूर्वी किमान चारशे ते पाचशे रुपये मिळत होते. यातून आमची उपजीविका सुरू असल्याचे निर्मला यांनी सांगितले . तसेच या कामात मला कधीच भीती वाटली नाही. मात्र लॉक डाऊन असताना सर्वच बंद होते. त्यावेळी तर कधीकधी पोलिसही मला अडवायचे, मात्र स्मशानात साफसफाईचे काम करीत असल्याचे पोलिसांना सांगताच तेही नंतर माझी अडवणूक करत नव्हते. विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या भीतीने आजही प्रेत यात्रेत खूपच कमी लोक स्मशानात येतात, तर दुसऱ्या दिवशी राख व अस्थी घेण्यासाठी एक किंवा दोनच लोक स्मशानात येत असतात, मात्र मला कधीही कोरोनाची भीती वाटली नसल्याचेही त्यांनी सांगितले.