ठाणे -महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे भरदिवसा 3 लाख रुपयांची रोकड पळवणारा अल्पवयीन चोरटा गजाआड झाला आहे. विशेष म्हणजे एका महिला पोलिसाने या चोरट्याला पाठलाग करून पकडले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शोभा जाधव असे चोरट्याचा पाठलाग करून 3 लाखांची रोकड त्याच्याकडून हस्तगत केलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
चोरट्याचा पाठलाग करतानाचा महिला पोलिसाचा थरार सीसीटीव्हीत कैद, चोरटा गजाआड
या चोरट्याला बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्याबरोबर त्याचा साथीदार असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले.
कल्याण पश्चिम परिसरातील बेतुरकर पाडा येथे राहणारे रामजी गुप्ता हे काल दुपारच्या सुमारास शंकरराव चौक येथून बँकेतून तीन लाखांची रोकड काढून घरच्या दिशेने परतत होते. सदानंद चौक येथून पायी जात असताना एका अल्पवयीन चोरट्याने मागून येऊन त्यांच्या पाठीवर जोरात थाप मारत तीन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पळ काढला. यावेळी गुप्ता यांनी आरडाओरड केली. याचदरम्यान वाहतूक विभागात कार्यरत पोलीस शिपाई शोभा जाधव या सदानंद चौकात वाहतूक नियोजनाचे काम करीत होत्या. आरडाओरड ऐकून त्यांचे त्या पळणार्या चोरट्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी चोरट्याचा पाठलाग करत त्याला पकडले.