ठाणे :महिलेला झालेल्या रक्तस्त्रावामुळे संपूर्ण आवारात रक्त पसरले होते. तर महिलेच्या पतीने रुग्णालयातील प्रसूती विभागाविरोधात निष्काळजीपणाची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात दिली. रुग्णालय प्रशासनाची मनमानी शहरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. घटनेचे अधिक वृत्त असे की, भिवंडीतील शांतीनगर भागात राहणारा अफसर शेख शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आपल्या गर्भवती पत्नीला प्रसूतीसाठी स्थानिक स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन आला होता. परंतु महिलेची प्रकृती अस्थिर असतानाही प्रसूती वॉर्डातील डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतरही चार तास रुग्णालय कर्मचाऱ्यांकडे विनवण्या करूनही महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते.
पडदे धरुन प्रसूतीची वेळ: त्यानंतर रुग्णालयाच्या आवारातील जमिनीवर प्रसूती वेदना सहन न झाल्याने त्या महिलेने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारातच एका बाळाला जन्म दिला. त्यावेळी उपस्थित महिलांनी एकत्र येऊन महिलेसाठी पडदे धरुन आडोसा केला आणि प्रसूती केली. परंतु प्रसूतीदरम्यान महिलेला जास्त रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश दारासह रुग्णालयाच्या आवारातील परिसर रक्ताने लाल झाला होता.
जीवाशी खेळ केल्याचा आरोप :घटनेची माहिती मिळताच प्रसूती विभागातील कर्मचाऱ्यांनी तूर्तास महिलेला रुग्णालयात दाखल करून घेत, त्यानंतर रक्ताने माखलेल्या संपूर्ण परिसराची साफसफाई करून घडलेला प्रकार दडविण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या पतीने सांगितले की, डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने पत्नी बेशुद्ध झाली. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. महिलेचा पती अफसर शेखने रुग्णालयातील प्रसूती वॉर्डातील सर्व कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणा व जीवाशी खेळ केल्याचा गंभीर आरोप केला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वृत्तीविरोधात रविवारी मध्यरात्री शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर :रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजेश मोरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. एकंदरीतच या घटनेमुळे पुन्हा एकदा इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला. याबाबत शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा :Teacher Protest News : दहावी बारावीची परीक्षा होऊ देणार नाही; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक