ठाणे- टिटवाळा, आंबिवली येथून रेल्वेने रुग्णालयात निघालेल्या इशरत शेख (वय २१) या गर्भवती महिलेला लोकलमध्येच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. अशा परिस्थितीत त्या महिलेला ठाणे रेल्वे स्थानकात उतरवून स्थानकातील वनरूपी क्लिनिक या प्रथमोपचार केंद्रात सुखरूप प्रसूती केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. शेख या महिलेने मुलाला जन्म दिला असून दोघेही सुखरूप आहेत.
लोकलमध्येच तिला सुरू झाल्या प्रसूती वेदना, प्रबंधकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप प्रसुती - thane
इशरत या कुटुंबीयांसह रुग्णालयात प्रसूतीसाठी टिटवाला अप जलद लोकलने सायन रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, डोंबिवली स्थानक सोडल्यानंतर त्यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या
टिटवाळा येथील रहिवासी असलेल्या इशरत या कुटुंबीयांसह रुग्णालयात प्रसूतीसाठी टिटवाला अप जलद लोकलने सायन रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, डोंबिवली स्थानक सोडल्यानंतर त्यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. याचदरम्यान, आरपीएफ हेल्पलाईनवरून ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयात त्याबाबत माहिती देण्यात येताच, उपप्रबंधक आर.के.दिवाकर, काटेवाला मनिषा पाटले यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस वर्षा मदने यांच्यासह फलाट क्रमांक ६ वर धाव घेतली.
सायंकाळी ६ च्या सुमारास फलाटावर लोकल येताच तात्काळ या महिलेला स्टेचरवरून स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. केंद्रातील डॉक्टर राठोड, लतिका कोटवाल आणि परिचारिका कोमल आणि भावना यांनी ६.३५ ला इशरत यांची सुखरूप प्रसूती केली. यानंतर त्या मायलेकांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानकातील हे क्लिनिक सुरू झाल्यापासून आतापर्यंतची ही तिसरी प्रसूती असल्याची माहिती प्रथमोपचार केंद्राचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली.