ठाणे- गणरायाचे आगमन एक दिवसावर येऊन ठेपले आहे. मात्र कल्याण-डोंबिवली शहरातल्या अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. याचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीने केडीएमसी प्रशासनाला 'खड्डेरत्न' पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे सत्ताधारी व प्रशासनाची चांगलीच गोची झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील अणेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. ते बुजविण्यासाठी मनसेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेला गणपतीपूर्वीच अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र शहरातल्या बहुतांश रस्त्यावर आजही खड्ड्यांचे साम्राज्य जैसे थे असल्याने या निषेधार्थ आज मनसेने 'खड्डे रत्न' पुरस्काराची मिरवणूक काढली. ही मिरवणूक डोंबिवलीतील फडके रोडपासून महापालिका विभागीय कार्यालयापर्यंत वाजत काढण्यात आली. यावेळी महापालिका कार्यालयाबाहेर पोलिसांनी मनसैनिकांना रोखून धरले होते. त्यामुळे मनसैनिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार उपहासात्मक घोषणाबाजी केली.