ठाणे - दोन मिनिटात खाण्यासाठी तयार होणारी मॅगी आत्तापर्यंत विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. मात्र, याच मॅगीवरून दोन व्यक्तींची मारामारी होऊ शकते याची कुणी कल्पना केली नसेल. मॅगीवरून ठाण्यात एका पती-पत्नीत हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली. या हाणामारीत पतीने पत्नीचा हात फ्रॅक्चर केल्याने हा कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. याप्रकरणी पीडित जखमी पत्नीने पतीविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोशन राजेश बठिजा (वय २६) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
ऐकावे ते नवलच... ‘मॅगी‘वरून पती-पत्नीत हाणामारी, पत्नीचा हात फ्रॅक्चर - ठाणे मॅगी वाद
मॅगीवरून ठाण्यात एका पती-पत्नीत हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली. या हाणामारीत पतीने पत्नीचा हात फ्रॅक्चर केल्याने हा कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. याप्रकरणी पीडित जखमी पत्नीने पतीविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हानसागर कॅम्प नंबर १ परिसरातील एका इमारतीत आरोपी रोशन हा पत्नी व वडिलांसह राहतो. ७ जूनच्या रात्री आरोपी पती मॅगी घेण्यासाठी बाहेर गेला. तेव्हा फिर्यादीच्या सासऱ्याने मुलगा रोशनला मॅगी का बनवून दिली नाही, असे विचारले. त्यानंतर पीडितेने आपल्या पतीला फोन करून मॅगी घेऊन घरी का नाही आले? असे विचारले. पत्नीने जाब विचारला याचा राग रोशनला आला. मॅगी घरी आणल्यानंतरही ती बनवून देण्यावरून पत्नीसोबत त्याने पहाटे अडीच वाजण्याच्या सुमाराला वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातच तिचा डावा हात फ्रॅक्चर झाला.
मॅगी बनवण्यावरून झालेला हा कौटुंबिक हिंसाचाराचा अनोखा प्रकार उल्हासनगर पोलीस ठाण्यापर्यंत गेला. जखमी पत्नीने पती रोशन विरोधात शुक्रवारी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. पी. खरे करत आहेत.