ठाणे- उल्हासनगर परिसरातील एकता नगरमध्ये नालेसफाई न झाल्याने नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. यामुळे भिंत कोसळून मालमत्तेची हानी झाली असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा दावा करणारे उल्हासनगर महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.
उल्हासनगरात नाल्याचे पाणी घरात शिरल्याने भिंत कोसळून एक जण जखमी - Sidharth Kamble
नालेसफाईचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे उल्हासनगर परिसरातील एकता नगरमधील घरात नाल्याचे पाणी शिरले. यामुळे भिंत कोसळून एक जण जखमी झाला.
उल्हासनगर महापालिकेच्या वतीने दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून शहरातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी ठेकेदारामार्फत करण्यात येते. मात्र, या ठेकेदाराने एकता नगरमधील नाल्याची सफाई वरच्यावर केल्याने पहिल्याच पावसात या ठिकाणी राहणारे मनोहर कदम या आदिवासीच्या घरात नाल्याचे पाणी शिरून भिंत कोसळली होती. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. हे कुटुंब मागील ३५ वर्षांपासून या ठिकाणी राहते. मात्र आम्ही आदिवासी असल्यानेच आम्हाला कुठलीही प्रकारची सुविधा पुरवली जात नसल्याचा आरोप कदम कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, भर पावसाळ्यात कदम कुटुंबीयांना उघड्यावर संसार करण्याची वेळ आली असून महापालिका त्यांना नुकसान भरपाई देणार का ? याकडे कदम कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.