महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण लोकसभा : मतदानात सव्वादोन टक्याने वाढ; हत्ती-मुंगीचा सामना रंगतदार - कल्याण लोकसभा मतदार संघ

कल्याण लोकसभा मतदार संघात १९ लाख ६५ हजार ६३७ मतदार असून त्यापैकी अंदाजे ८ लाख ४२ हजाराच्या आसपास मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

मतदानाचा हक्क बजावताना नागरिक

By

Published : Apr 30, 2019, 11:33 PM IST

ठाणे - कल्याण लोकसभा मतदार संघात महाआघाडीने आगरी कार्ड खेळत बाबाजी पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर गेल्या महिन्याभर प्रचाराचा मुद्दा आगरी कार्ड म्हणजे भूमिपुत्रावरच गाजत होता. त्यातच बाबाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता हत्तीला मुंगीसमोर घाबरायची गरज काय? असा सवाल उपस्थित करून निवडणुकीत रंगत आणली होती. २००९ च्या निवडणुकीत ३४ टक्के, तर २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना ४२.९४ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मात्र ४५.२८ मतदान झाल्याने मतांच्या सव्वादोन टक्क्यात वाढ झाली आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवाराला वाढलेल्या मतांचा फटका बसण्याची शक्यता असल्याने हत्ती-मुंगीचा सामना अधिकच रंगतदार ठरणार आहे.

कल्याण मतदारसंघात एकूण २८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. चुरशीच्या लढतीत राजकीय नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील, महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे या मातब्बरांचा समावेश आहे. या निवडणुकीत महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन विकास आघाडीसह अपक्ष असे २८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुती आणि महाआघाडीतच होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ २००९ पासून आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिल्याने शिवसेनेचे ‘कल्याण’ अशी ओळख शिंदेशाहीमुळे निर्माण झाली. आता मात्र, महाआघाडीने ३० वर्षानंतर आगरी कार्ड खेळत शिंदेशाहीला टक्कर देण्यासाठी बाबाजी पाटलांना मैदानात उतरवले. मात्र, सुरुवातीला शिवसेनेला एकतर्फी निवडणूक होऊन मोठ्या मताधिक्याने डॉ. शिंदे निवडून येतील, असे वाटत होते. बाबाजी पाटील यांनी भूमिपुत्राला संधी द्या, अशी आगरी-कोळी बांधवाना साद घालून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केल्याने महायुतीच्या गोटात खळबळ उडाली होती. त्यानंतर महायुतीनेही आगरी-कोळी नेत्यांचा मेळावा आयोजित करून आगरी कार्डला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र मतदारांमध्ये युतीबाबत अधिकच असंतोष खदखदत होता. तर दुसरीकडे युतीच्या हक्काची कोकणातील हजारो मतदारांनी सलग सुट्या असल्याने त्यांनीही कोकणात जावून मुक्काम ठोकला. यामुळेही युती-आघाडीत 'काटे की टक्कर' होणार आहे.

लोकसभा मतदारसंघांतील ६ विधानसभेतील टक्केवारी पाहता २०१४ च्या टक्केवारीच्या तुलनेत दीड टक्क्यात वाढ झाली आहे. मात्र, काही विधानसभा मतदारसंघांत किंचीत मताची टक्केवारी वाढली, तर काही मतदारसंघांत घट झाली. कल्याण लोकसभेतील ६ विधानसभापैकी २ म्हणजेच मुंब्रा आणि उल्हासनगर राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तर अंबरनाथ आणि कल्याण ग्रामीण शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर डोंबिवली विधानसभा ही एकमेव भाजपच्या ताब्यात आहे. कल्याण पूर्वमधून भाजप सहयोगी अपक्ष आमदार आहे. आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांची भिस्त आगरी, कोळी, मुस्लिम, आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पांरपरिक मतांवर होती. त्यातच कल्याण ग्रामीण, मुंब्रा, आणि उल्हासनगर, अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघातून बऱ्यापैकी आघाडीला मतदान झाले आहे. तर युतीचे डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांची भिस्त डोंबिवली, कल्याण पूर्व, अंबरनाथ या विधानसभेतील मतदारांवर आणि भाजप सेनेच्या पारंपारिक मतावर अवलंबून होती. मात्र, कल्याण पूर्व विधानसभामध्ये मतदान कमी झाल्याने त्याचा फटका युतीच्या उमेदवारला बसण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी तरुण मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता, तर ज्येष्ठ मतदारांची महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. मात्र, यंदाची चुरशीची लढत पाहता कल्याण लोकसभा मतदार संघातील मतदान तणावपूर्ण शांततामय वातावरणात पार पडले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथमध्ये ४४ टक्के, उल्हासनगरमध्ये ४२.५ कल्याण पूर्व-४१ टक्के, डोंबिवलीत ४३.२ टक्के, कल्याण ग्रामीणमध्ये ४६.५, तर मुंब्रा कळवा ३९, असे एकूण सरासरी ४५.२८ टक्के मतदान झाले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात १९ लाख ६५ हजार ६३७ मतदार असून त्यापैकी अंदाजे ८ लाख ४२ हजाराच्या आसपास मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामुळे कल्याण लोकसभा मतदार संघात अटीतटीची लढत असून यंदा मताच्या टक्यात सव्वा दोन टक्याने वाढ झाल्याने या लढतीमधील चुरस कायम आहे. मतदान कुणाच्या पारड्यात गेले, मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला? हे येत्या २३ मे रोजी स्पष्ट होईल. आता मतदानानंतर सर्व मतयंत्रे सील करून पोलीस बंदोबस्तात डोंबिवलीत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये हलवण्यात आली. या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

मोदी लाट ओसरल्याने मतांची वाढलेली टक्केवारी बाबाजीच्या पथ्यावर?
गेल्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने ४२.९४ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र लाट ओसरल्याने मताचा टका किंचीत वाढला. त्यातच ठाणे जिल्ह्यातील उन्हाचा पारा गेले तीन दिवस बराच वाढला होता. त्यामुळे उन्हातान्हात मतदानकेंद्रांवर रांगा लावून घाम पुसत मतदान करणे टाळले. वाहतूक कोंडीचे ग्रहण लागलेला मतदारसंघ असल्याने महायुतीच्या वचननाम्यात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतूक अशा वाहतुकीच्या सर्व पर्यायांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत कल्याण लोकसभा मतदारसंघ वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी होलिस्टिक सोल्यूशनचा अवलंब करण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली. मात्र, मतदारांच्या ती पचनी पडली नसल्याचे दिसून आले आहे. तर ग्रामीण भागातील मतदारांनी स्वतः बाहेर पडत मतदान केले आहे. त्यातच कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटनात्मक जाळे भक्कम आहे. मात्र, मतदानाची मतदारांना पूर्वसूचना देणाऱ्या पावत्या सेनेकडून वितरीत केल्या नसल्याची माहिती मतदार देत आहे. हजारो नावे मतदार यादीतून अचानक वगळण्यात आल्याने मतदानात केवळ सव्वादोन टक्के वाढ झाली आहे. या मताचा वाढता टक्का बाबाजीच्या पथ्यावर पडणार का? या चर्चा रंगाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details