ठाणे - 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या (एमसीए) निवडणुकीत मॅनेजिंग कमिटी सदस्य म्हणून ठाण्यातील युवा कार्यकर्ते व माजी नगरसेवक विहंग प्रताप सरनाईक यांची निवड झाली आहे. १६५ मते मिळवून निवडणुकीत विहंग सरनाईक हे विजयी झाल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ठाणे शहर आणि आसपासच्या महानगरात क्रिकेटसाठी चांगले वातावरण तयार करणे तसेच येथून नवीन क्रिकेटपटू तयार व्हावेत म्हणून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विहंग यांनी सांगितले. त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा -जडेजाचा मोठा पराक्रम, कसोटीत साकारले सर्वात जलद बळींचे दुहेरी शतक
राष्ट्रीय पातळीवर उंच उडी व लांब उडी मधील खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विहंग याना खेळाडूंना कोणत्या सुविधा हव्या असतात हे माहित आहे. या निवडणूकीत मुंबई - ठाण्यातील ३५० क्लब व ३९ दिग्गज क्रिकेटपटूंनी मतदान केले. विहंग सरनाईक यांना विक्रमी असे मतदान झाले आहे.
'मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काम यापुढे ठाण्यात ठळकपणे करणार आहोत. ठाण्यात व आसपासच्या शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी परिपूर्ण असे पोषक वातावरण तयार करणे व त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी मी प्लॅन तयार केला आहे. एमसीएचे काम ठाण्यात अधिक प्रभावीपणे राबविणे हे माझे पाहिले लक्ष्य आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या ठाण्यात व आसपासच्या भागात मैदाने उपलब्ध करून देणे, क्रिकेटपटूंना पायाभूत सुविधा देणे असे असा निर्धार मी केला आहे', असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
'आज ठाणे व आसपासच्या परिसरातील मुलांना लोकलने क्रिकेटचा सराव करण्यासाठी मुंबईला जावे लागते, त्यांना त्यांच्या सामानाची जड बॅग घेऊन जावे लागते आणि त्यातच मुलांचा वेळ जातो. भविष्यात सरावासाठीच्या सर्व सुविधा ठाण्यात दिल्यास येथील मुलांचा वेळ वाचेल आणि त्यासाठी ठाण्यात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण प्राधान्य देणार आहोत', असेही सरनाईक यांनी सांगितले.
ठाणे महानगर व ठाण्याची उपनगरे असलेली नवीन महानगरे मीरा भाईंदर , अंबरनाथ बदलापूर , उल्हासनगर या भागाला विहंग सरनाईक यांच्या रूपाने प्रतिनिधीत्व मिळाले असल्याने येथील सर्व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता नक्कीच ठाण्यात क्रिकेटसाठी चांगले काही तरी घडेल असा विश्वास लोकांकडून व्यक्त केला जात आहे.