ठाणे - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणला दुर्दैवाने स्थगिती मिळाली. मात्र, मराठा आरक्षण टिकले पाहिजे. ते टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेत असल्याची माहिती नगरविकासमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिंदे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेने नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर आपले मत मांडले.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रखरतेने पुढे आला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज अधिकच तीव्र लढा करण्याच्या तयारीत आहे. ठाणे जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी तर कोरोना संक्रमण झुगारून समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. काल (रविवारी) जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीला कारस्थानांचा वास येत आहे, असे मत मांडले. तसेच कुचकामी ठरलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात मराठा समाजाच्या नेत्यांनी आक्रोश आणि संताप व्यक्त केला.