उरण -रात्रभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे उरण तालुका चांगलाच झोडपून निघाला आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. येथील सामान्य नागरिकांसाठी महत्वाच्या उपचार केंद्र असणाऱ्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय देखील मुसळधार पावसामुळे पाणी भरले होते. यामुळे येथील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.
भरावांमुळे ओढावली परिस्थिती
उरण तालुक्यातील गोरगरीब, सामान्य माणसांसाठी महत्वाच्या असणाऱ्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी रात्री मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे येथील कार्य बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाणी उपसण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती. येथील भाग हा खोलगट असल्याने, डुक्करखार हा भाग प्रत्येक पावसामध्ये पाण्याखाली येते. मात्र, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय हे बांधताना मिठा भराव करून, उंचावर बांधण्यात आल्याने या रुग्णालयामध्ये पाणी साचण्याचा प्रकार घडत नव्हता. मात्र, आजूबाजूला होणारे भराव आणि नगरपालिकेने अधिक उंच केलेले रस्ते यामुळे रुग्णालयाचा भाग हा इतर भागापेक्षा खाली आला आहे. यामुळे आता समुद्राच्या भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस पडल्यास या रुग्णालयात पाणी भरण्याच्या घटना घडतात. शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अशाच समस्येला सामोरे जावे लागले आहे. ज्यामुळे येथील कर्मचारी आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.