ठाणे : शेतकऱ्यांचा पारंपरिक असलेला बैलगाडा शर्यतीचा खेळ आठ वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी हा खेळ पुन्हा सुरु करावा म्हणून तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सूचना देऊन सुप्रीम कोर्टात बाजू मांडत बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील इच्छा मोंदींनी पूर्ण करण्यासाठी आज हजरोंच्या संख्येनं बैलगाडा शर्यतीची आयोजन करण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रसरमाध्यमांशी बोलताना सांगितले.
छखड्यांच्या जंगी शर्यतींचा थरार : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत भिवंडी तालुक्यातील ईताडे गावात भव्य छखड्यांच्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन रविवारी सकाळी ९ ते ५ या कालावधीत करण्यात आले. भिवंडीतील जय मोनशेरा प्रसन्न ईताडे या ठिकाणी बैलगाडा शर्यत प्रेमींना छखड्यांच्या जंगी शर्यतींचा थरार अनुभवायला आला.
केंद्रीय राज्यमंत्री मैदानात : छखड्यांच्या बैलगाडा शर्यतीमध्ये आज १५ जिल्ह्यातून सुमारे तीन हजारांच्यावर बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला आहे. ठाण्यातील या शर्यतीमध्ये कोट्यवधींची उलाढाल एकच दिवशी झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. विशेष म्हणजे छखड्यांच्या बैलगाडा शर्यतीच्या घटनास्थळी येताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे चक्क छखड्यांच्या बैलगाडाची दोरी हातात धरून त्यांनीही बैलगाडा शर्यतीचा आनंद अनुभवल्याने शर्यतीच्या ठिकाणी असलेल्या हाजरोच्या जमावासह ढोल ताश्याच्या गजरात त्यांचे स्वागत कऱण्यात आले.