ठाणे : भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी अमिना कंपाऊंडच्या सुप्रीम हॉटेलजवळील एका इमारतीमधून दोन गुन्हेगार तरुणांना अटक केली आहे. या तरुणांकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जावेद असफनदियार खान (वय, ४४) आणि मोहम्मद सलामत मोशा शेख ( वय, ३३) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
गुप्त माहितीची आधारे झाली कारवाई : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक सुरेश घुगे पोलीस पथकासह भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत १७ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गस्त करीत असताना शहरातील धामणकर येथील अमिना कंपाऊंड भागात सुप्रीम हॉटेलजवळ दोघे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर,पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे, योगेश कवडे, पोलीस नामदार उमेश नागरे,पोलीस शिपाई कुंभार, घुगे,विजय ताटे या पोलीस पथकाने सुप्रीम हॉटेलजवळ सापळा रचला. नजराना बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील घर क्र.८ मध्ये राहणारे जावेद आणि मोहम्मद या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. दोघांकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
गुन्हा दाखल :पोलीस हवालदार विजय शंकर कुभार यांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१),१३५ नुसार अटक केली असून सदर गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे कुठून आली ? आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का ? याचा तपास केला जात आहे.