ठाणे - सतराव्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्यातच भिवंडी तालुका पोलीस पथकाने वाहन तपासणीसाठी वाडा-भिवंडी मार्गावरील शेलार (नदीनाका) येथे अचानक नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदीत दोघे दारू माफियांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून हजारो रुपयांची दारू पकडण्यात आली आहे.
भिवंडी-वाडा मार्गावर पोलिसांची नाकाबंदी.. हजारो रुपयांच्या दारूसह दोघे गजाआड
शनमुगन शेलुराज कवंड (४०) व संजय अंबादास जुकर (३२ दोघेही रा. नागाव) असे अटक केलेल्या दारू माफियांची नावे आहेत.
पोलिसांकडून सँट्रो कारची तपासणी सुरु असताना एक दारूमाफिया पोलिसांची नजर चुकवून पसार झाला होता. त्यास पोलिसांनी सापळा लावून गजाआड केले आहे. शनमुगन शेलुराज कवंड (४०) व संजय अंबादास जुकर (३२ दोघेही रा. नागाव) असे अटक केलेल्या दारू माफियांची नावे आहेत.
भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे, पोलीस शिपाई शांताराम काळे, बाबासाहेब बोरकर, विकास आव्हाड आदींच्या पोलीस पथकाने रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वाहने तपासणीसाठी नाकाबंदी केली होती. त्यावेळी दारू माफिया शनमुगन व संजय हे दोघे सँट्रो कारमधून बेकायदेशीरपणे ४० हजार ५०० रुपये किंमतीच्या विविध ब्रँडच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स विक्रीसाठी घेऊन वाड्याकडून येत होते. मात्र, ते दोघेही पोलिसांच्या तावडीत सापडले.
यातील एक दारू माफिया संजय जुकर हा पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, पोलिसांनी त्याला सापळा लावून गजाआड केले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता शनमुगन यास एक दिवसाची पोलीस कोठडी तर संजय जुकर याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख रुपये किंमतीची सँट्रो कार व ४० हजार ५०० रुपये किंमतीचा अनधिकृत देशी, विदेशी दारूचा साठा असा १ लाख ४० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.