महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संपत्तीसाठी गोळी झाडून भावाचा खून, सावत्र भावासह दोघे गजाआड - ठाणे हत्या बातमी

संपत्तीच्या वादातून सावत्र भावानेच आपल्या भावाची गावठी पिस्तुलाने गोळी झाडून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह वाशी खाडीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिला होता. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 3 किलो 700 ग्रॅम वजनाचे सोने, गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस व एक स्कूटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जप्त केलेला मुद्देमाल
जप्त केलेला मुद्देमाल

By

Published : Sep 28, 2020, 6:11 PM IST

ठाणे- संपत्तीच्या वादातून सावत्र भावाने भावाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. राकेश माणिक पाटील (वय 35 वर्षे), असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सावत्र भाऊ सचिन सर्जेराव पाटील (वय 26 वर्षे) आणि त्याचा साथीदार गौरव राजेश सिंग (वय 27 वर्षे) या दोघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा केला. त्यापैकी गौरव सिंह यास पोलिसांनी बुधवारी (दि. 23 सप्टें.) अटक केली होती. तर या हत्येच्या घटनेतील मुख्य सूत्रधार सचिन पाटील हा फरार होता. त्यास अखेर कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी (दि.26 सप्टेंबर) नवी मुंबई परिसरातून अटक केली. यातील सचिनला 4 ऑक्टोबर तर गौरवला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस आयुक्त

ठाणे महापालिका नगरसेवक माणिक बाबू पाटील यांचा जीबी रोड, विजय गार्डन येथे बंगला आहे. या बंगल्याची व इतर मालमत्तेच्या वाटणीवरून मृत राकेश माणिक पाटील व मुख्य आरोपी सचिन सर्जेराव पाटील या दोघा सावत्र भावांमध्ये वाद होता. याच वादाच्या कारणातून सचिन याने राकेशचा काटा काढण्याची योजना आखली होता. सचिनने आपल्या वडिलांच्या गाडीवर चालक असलेल्या गौरव राजेश सिंह याची मदत घेत राकेशची गोळी झाडून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने राकेशचा मृतदेह वाशी खाडीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिला. याच दरम्यान, राकेश अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार 20 सप्टेंबरला कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या घटनेचा तपास करत असताना राकेशची हत्या त्याच्याच सावत्र भावाने केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीचा साथीदार गौरव सिंह यास बुधवारी रात्री अटक केली.

तर फरार झालेला मुख्य आरोपी सचिन पाटील याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके नेमली होती. शोध सुरू असतानाच मुख्य आरोपी सचिन पाटील हा नवी मुंबईतील उलवे परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 26 सप्टेंबरला रात्री पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सचिन पाटील याने आपणच सावत्र भावाची गावठी पिस्तूलातून गोळी झाडून हत्या केल्याचे आणि घरातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून 3 किलो 700 ग्रॅम वजनाचे सोने, गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस व एक स्कूटर, असा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. मृत राकेशचा मृतदेह अद्याप मिळालेला नसून पोलीस अग्निशमनदल, स्थानिक मच्छिमार यांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेत आहेत. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता सचिन यास 4 ऑक्टोबर तर गौरव सिंग यास 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -चिमुकल्याचे अपहरण करून 70 हजाराला सौदा; पोलिसांनी 'असा' शोध घेत केली 5 जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details