ठाणे Tuberculosis Test: वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2023) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारांमध्ये आणि विशेषतः मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. तेथील पदार्थ विकत घेत असताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल ग्राहक अनभिज्ञ असतात. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं आहे की, नाही याची खातरजमा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं (Thane Municipal Corporation) अशा कर्मचाऱ्यांची क्षयरोग चाचणी सुरू केली आहे.
क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ :गेल्या काही वर्षात ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये (Tuberculosis patients) लक्षणीय वाढ झाल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलं आहे. या आजाराची लागण झाल्यावर पहिल्या काही दिवसातच जर त्याचं निदान झालं तर त्यावर नियंत्रण मिळविणं सोपं जातं. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेनं त्या दिशेनं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. क्षयरोग हा शंभर टक्के बरा होणारा आजार आहे. समाजामध्ये त्याविषयी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मागीलवर्षी ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोगाचे 8500 हून अधिक रुग्ण आढळून आले होते. ज्यापैकी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये पण 7556 रुग्ण आढळले ज्यापैकी पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत.
दुकानांमध्ये रुग्ण शोधण्याची मोहीम : दिवाळीमुळे मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. जर एखादा कर्मचारी संक्रमित असेल तर ग्राहकांना देखील त्याची लागण होऊ शकते. या रोगाला आळा घालण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सरसावला आहे. बुधवारपासून शहरातील दुकानांमध्ये क्षयरोग आजाराचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. यासाठी आठ जणांची टीम तैनात केली आहे. दुकानातच कर्मचाऱ्यांचे एक्स-रे काढणाऱ्या पोर्टेबल मशीनची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना आजाराबाबत माहिती देऊन त्यांचं प्रबोधन देखील करण्यात येत आहे. क्षयरोग हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून या चाचण्यांमुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळणार आहे. तसंच त्याचं ग्राहकांना संक्रमणही होणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी केल्यानंतर त्या दुकानावर 'टीबी फ्री शॉप' चं स्टिकर देखील लावण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.