नवी मुंबई- राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त (असंवर्ग) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे, गुन्हे शाखेचे डॉ. तुषार दोषी आणि मुख्यालयाचे उपायुक्त राजेश बनसोडे या तिघांची देखील बदली झाली आहे.
राज्य पोलीस दलातील 87 आयपीएस अधिकार्यांच्या सोमवारी गृहविभागाने अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यात नवी मुंबईतील या तीन उपायुक्तांचा समावेश आहे. यातील डॉ.सुधाकर पाठारे हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पन्नासपेक्षा जास्त गुन्हेगारांना तडीपार करणारे एकमेव पोलीस उपायुक्त ठरले आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करून डॉ. सुधाकर पाठारे यांनी नवी मुंबईत कायदा सुव्यवस्थेला बळकटी दिली होती.
गृह विभागाने त्यांची नियुक्ती राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई पोलीस उपायुक्त पदी केली आहे. तर यातील दुसरे उपायुक्त डॉ. तुषार दोषी यांनी नुकत्याच खळबळ माजवणाऱया कळंबोली बॉम्ब प्रकरणी तपासात स्वतः उतरून महत्वाची भूमिका बजावली होती. मितभाषी, शांत स्वभाव आणि त्याचबरोबर सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी यामुळे ते सर्वांचे आवडते पोलीस उपायुक्त ठरले होते. त्यांची बदली पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळच्या प्राचार्यपदी करण्यात आली आहे. तर नवी मुंबई पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त राजेश बनसोडे यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
हे असणार आहेत नवी मुंबईचे तीन नवे पोलीस उपायुक्त
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहविभागाने राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात नवी मुंबईतील तीन उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. आता नवी मुंबईला नवे तीन पोलीस उपायुक्त मिळणार आहेत. यात महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सचिवालयाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांची नवी मुंबई गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदियाच्या पोलीस अधीक्षक विनिता साहू या नवी मुंबई पोलीस मुख्यालयाची जबाबदारी पाहतील. त्याचबरोबर यापूर्वी देखील नवी मुंबईचे उपायुक्त म्हणून काम पाहिलेले सुरेश कुमार मेंगडे यांना पुन्हा एकदा मुख्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे.