ठाणे - सलग ३ दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार सुट्या असल्याने हजारो पर्यटकांनी निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी धबधब्यांच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी सरसकट सर्वच धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
ठाण्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड ठाण्यातील प्रामुख्याने शहापूर तालुक्यातील कसारा घाटापासून १५ किलोमीटर अतंरावर असलेल्या अशोका धबधबा, माहुली धबधबा याठिकाणी मागील काही वर्षापासून पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दररोज हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात.
या दोन्ही धबधब्यांसह जिल्ह्यातील इतर धबधब्यात अनेक दुर्दैवी घटना यापूर्वीही घडले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील काही अतिउत्साही पर्यटक तर काही मद्यपान करून धबधब्याच्या दरीच्या भागातील पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. मात्र, त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने तसेच काही पर्यटक पाय घसरून तर काहींचा तोल जाऊन त्यांना आपला जीव गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करूनही तसेच धोक्याच्या सूचनेचे फलक लावूनही असे दुर्दैवी प्रकार घडत आहेत.
दरम्यान, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग ३ दिवस सुट्ट्या लागून आले. त्यामुळे भंडारदरा, शिर्डी, नाशिक, वणी, सापुताराकडे जाणारे मुंबई व पुण्यातील भाविक व पर्यटक या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या धबधब्याकडे आनंद घेण्यासाठी धाव घेतली. मात्र, ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे मागील ३ दिवसात लाखो पर्यटकांचा हिरमोड झाल्याने ते परतीच्या वाटेवर जाताना दिसून आले.