मिरा भाईंदर- भाईंदर पश्चिम येथे असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. रुग्णालयातील पहिल्या माळ्यावर शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तर प्रशासनाने या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कोविड रुग्णालयात शौचालयाच्या दुर्गंधीमुळे रुगणांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष - मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रात वाढले कोरोनाबाधित रुग्ण
मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. येथे असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. रुग्णालयातील पहिल्या माळ्यावर शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील एकमेव पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे शासकीय रुग्णालय आहे. राज्य शासनाने कोविड १९ रुग्णालय या रुग्णालयाला घोषित केले आहे. या ठिकाणी सर्व कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात नियमित साफसफाई होत असे. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. त्यानंतर मात्र महापालिका प्रशासन साफसफाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. दोन दोन दिवस शौचालय भरले असताना कोणत्याही प्रकारची साफसफाई झाली नाही. त्यामुळे रुगणांनी मूत्रविसर्जन, शौचालयासाठी जायचं कुठे हा प्रश्न उपस्थित झाला आहे..?कोरोनाची भीती त्यात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुगणांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी चांगले असले तरी शौचालयात असलेली घाण, दुर्गंधीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारू शकत नाही.
या व्हिडिओबाबतची तक्रार डॉ. प्रमोद पडवळ यांच्याकडे केली. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. फोनही उचलला नाही. कोरोनाच्या रुग्णांना अशी सुविधा दिली, तर रुग्ण बरे कसे होणार. प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया सुमेध सरफरे यांनी दिली. या संदर्भात सर्व माहिती घेऊन शौचालय साफ का केले गेले नाही, जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. ताबडतोब शौचालयची साफसफाई करण्यात येईल, अशी माहिती मीरा भाईंदर महापालिकेचे उपायुक्त संभाजी पाणपट्टे यांनी दिली आहे.