ठाणे -भरधाव ऑईल टँकर धावणाऱ्या चारचाकीवर उलटल्याने झालेल्या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात गायमुख-घोडबंदर रस्त्यावर आज (दि. 27 सप्टेंबर) मध्यरात्री झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, टँकरचा पुढील भाग निसटून दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला गेला तर चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे ठाणे-घोडबंदर-अहमदाबाद (गुजरात) या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ठाणे ते मुंबई या रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने एक भरधाव टँकर धावत्या चारचाकीवर उलटला. यात चारचाकीसह वाहनातील प्रवासी टँकरखाली दबले गेले होते. अपघाताची माहिती मिळताच ठाणे व मिरा-भाईंदर महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस प्रशासन व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर चारचाकी वाहनाला टँकरखालून काढण्यास पथकाला यश आले. वाहन चालक विनोद खरात (वय 30 वर्षे), पांडूरंग पाटील (वय 45 वर्षे) व सृष्टी पाटील (वय 18 वर्षे), असे गंभीर जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ मिरारोड येथील एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.