ठाणे: सरुउद्दीन ताजउद्दीन शेख (वय ३२, रा. अमृतनगर, शादीमहल रोड, मुंब्रा), जुबेर जलील अन्सारी (वय २६ रा. दारुखाना झोपडपटटी, शिवडी मुंबई), शहाबुद्दीन ताजउद्दीन शेख (वय ३२, रा. अमृतनगर, शादीमहल रोड, मुंब्रा) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. कल्याण पश्चिम भागात राहणारे रविंद्र शेट्टी (वय ६३) यांचे डोंबिवली पूर्वेकडे स्टेशनजवळ डिलक्स वाईन शॉप नावाचे दारू विक्रीचे दुकान आहे. ११ जून रोजी रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर १२ जूनला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर लोखंडी कटावणीने उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या तिजोरीतील आठ लाख रुपयांची दैनंदिन व्यवहारातील रक्कम या चोरट्यांनी पळवून नेली.
या पथकाने केला तपास:त्यानंतर दुकान मालक रविंद्र शेट्टी हे जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे आढळून आले. हा प्रकार कळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दुकान मालक रविंद्र शेट्टी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार पी. के. भणगे, विशाल वाघ, नितीन सांगळे, शिवाजी राठोड, निसार पिंजारी, कोळेकर, लोखंडे यांचे विशेष तपास पथक तयार केले. पोलिसांनी वाईन शाॅप परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.