ठाणे -डोंबिवली एमआयडीसीच्या फेज एकमधील खंबाळपाडा रस्त्यावर असलेल्या एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची धारदार शस्त्राने अज्ञात चोरट्यांनी निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असण्याचा संशय मानपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. ग्यानबहादुर भिमबहादुर गुरूम (वय 60 वर्षे) मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो खंबाळपाडा रोडला विजय पेपर प्रॉडक्ट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता.
कडवा प्रतिकार केल्याने हत्या -मृत ग्यानबहादुर हे मंगळवारी (दि. 14 जून) रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील विजय पेपर कंपनीत तैनात असताना अज्ञात चोरट्यांनी कंपनीत चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. त्यांना सुरक्षा रक्षक ग्यानबहादूर यांनी कडवा प्रतिकार केला असावा, या वादातून चोरट्यांनी ग्यानबहादुर यांच्यावर धारदार, टणक हत्याराने सर्वांगावार फटके मारून त्यांना गंभीर दुखापती केल्या. यात ते जागीच ठार झाले. त्यांना ठार मारल्यानंतर चोरट्यांनी मृत ग्यानबहादुर यांचा मोबाईल, इतर धातुच्या वस्तू चोरून नेल्या.