ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी कोविड सेंटर्स उभारण्यात आली आहेत. या सेंटर्समध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाही. पण, कल्याणजवळच्या गोविंदवाडी येथे महापालीकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आसरा फाउंडेशनमधील विचित्र प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या सेंटरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या एका वृद्ध रुग्ण महिलेकडील रोकडसह सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले आहे. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
65 वर्षीय वृद्धा कल्याण-पडघा रोडला असलेल्या बाफगावातील अपार्टमेंटमध्ये राहते. गोविंदवाडीतील आसरा फाउंडेशन या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या या महिलेकडील 50 हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्यांची सोन्याची चेन, 30 हजार रुपये किंमतीचे प्रत्येकी 6 ग्रॅम वजनाचे कानातील 2 झुमके, 15 हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी 3 ग्रॅम वजनाच्या झुमक्यांच्या 2 पट्ट्या आणि 2 हजार रूपये रोख रक्कम, असा 97 हजारांचा ऐवज 3 ऑक्टोबरच्या रात्री 10.30 ते 11 ऑक्टोबरच्या दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान चोरीस गेला. याबाबत वृद्धेच्या मुलाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, 30 सप्टेंबरला त्या 65 वर्षीय वृद्धेला ताप व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तिची कोरोना चाचणी केली. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने 2 ऑक्टोबरला उपचारासाठी दुपारी 3.30 वाजता गोविंदवाडीतील आसरा फाउंडेशन येथे दाखल करण्यात आले. तिला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाताना तिच्या कानात व गळ्यात सोन्याचे दागिने होते. तसेच तिच्या पर्समध्ये 2 हजारांची रोख रक्कमही होती. सुरुवातीला फाउंडेशनच्या जनरल वॉर्डमध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना त्या वृद्धेने सोन्याचे दागिने तिच्या पर्समध्ये काढून ठेवले व ही पर्स स्वतःजवळच ठेवली. जनरल वॉर्डमध्ये जास्त त्रास होऊ लागल्याने वृद्धेला 3 ऑक्टोबरला रात्री 10.30 च्या सुमारास तेथील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तेथेच त्या वृद्धेवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, 11 ऑक्टोबरला दुपारी 12.30 च्या सुमारास मुलाने त्या वृद्धेस फोन केले असता पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरीस गेल्याचे त्यांनी मुलाने सांगितले. त्यानंतर याबाबत मुलाने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा -रेल्वे कॅन्टीनच्या पायाभरणीतील मृतदेहाचा पोलिसांनी लावला छडा; दोघांना अटक