ठाणे- भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झालेल्या डोंबिवलीकरांना यापूर्वी शहरातील विविध ठिकाणी माकडांचे दर्शन झाले होते. आता एमआयडीसीच्या निवासी क्षेत्रात मंगळवारी दुपारच्या सुमारास जाडजूड माकड आढळून आले. यामुळे बच्चे कंपनीसह नागरिकांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. या माकडाला परिसरातील रहिवाश्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. इमारतीच्या गच्चीवर पक्षी पाहण्याची सवय असलेल्या डोंबिवलीकरांना माकडही सहजतेने नजरेस पडत आहे.
काही महिन्यांपूर्वी फडके रोडसह एमआयडीसी भागामध्ये आढळलेल्या माकडांना नागरिकांकडून खाद्य पुरवण्यात आले. मात्र, त्यानंतर ही माकडे अचानक स्थालांतरीत झाली होती. गेल्यावर्षी रेल्वेच्या ठाकुर्ली येथील पॉवरहाऊसमध्ये एका माकडाला शॉक लागल्याने ते जखमी झाले होते. डोंबिवलीत फिरणार्या माकडांचा शोध घेत असताना ठाकुर्ली येथील पॉवरहाऊसमध्ये एक माकड जखमी अवस्थेत आढळून आले. गेल्या अनेक दिवसांनंतर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी क्षेत्रात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक एक जाडजूड माकड अवतरले. मिलापनगरमध्ये असलेल्या इमारतींच्या आवारात हे गाढवासारखे दिसणाऱ्या या जाडजूड माकडाला काही रहिवासी खायलाही देत आहेत.