ठाणे- कल्याण शहरात चोरीचे सत्र सुरूच असून एकाच रात्री चोरट्यांनी ३ दुकाने फोडून रोख रकमेसह आईस्क्रीम खात खात आईस्क्रीम दुकानातून हजारोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात 2 चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे 24 तास रहदारीचा रस्ता असलेल्या बिर्ला महाविद्यालयाशेजरी असलेल्या 3 दुकानांत चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या चोरट्यांचा शोध घेत आहे.
कल्याण शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहे. त्यातच कल्याण-मुरबाड मार्गावर वोल्टर फर्नांडिस यांचे डी.जे. डॉल नावाने हॉटेल आहे. तर याच हॉटेल शेजारी मनोज फडतरे यांचे मनपसंद आईस्क्रीम व झेरॉक्सचे दुकाने आहे. 2 चोरट्यांनी डी.जे. डॉल हॉटेलचे काल पहाटेच्या साडेपाच वाजता शटर उचकटून आत प्रवेश केला. हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड घेऊन हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली. त्यांनतर मनपसंद आईस्क्रीम व झेरॉक्सच्या दुकानामागील लाकडी दरवाजा फोडून आत प्रवेश केला. या 2 चोरट्यांनी आईस्क्रीम खात खात सुमारे 20 मिनिटांत विविध कंपन्यांच्या आईस्क्रीम आणि कोल्ड्रींग्स असा 10 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल आईस्क्रीमच्या दुकानातून लंपास केला. तर झेरॉक्सच्या दुकानामधील गल्ल्यातील रोकड घेऊन पोबारा केला. चोरीचा सर्व प्रकार आईस्क्रीम दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या चोरीच्या घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करत आहेत.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे गेल्या महिन्याभरात पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यावरून दिसून आले आहे. तर दुसरीकडे मनपसंद आईस्क्रीम दुकानात 2 महिन्यात 3 वेळा चोरट्यांनी फोडल्याचे सांगण्यात आले. यामुळे वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.