उल्हासनगर (ठाणे) - उल्हासनगर महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभापती दालनासमोरील सिलिंग (छत) शनिवारी (दि. 18 जुलै) रात्रीच्या सुमारास कोसळले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने कोणी जखमी वा मोठी दुर्घटना झाली नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणचे सुशोभिकरण करून लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे विविध दालनाचे व मुख्यालयाचे सुशोभीकरण वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयातील सिलिंग कोसळले
उल्हासनगर महापालिकेतील स्थायी समिती सभापतीच्या दालनासमोरील छत शनिवारी (दि. 18 जुलै) रात्री कोसळले. ही घटना रात्री घटल्याने सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही.
उल्हासनगर महापालिका मुख्यालयात असलेल्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व अन्य राजकीय नेत्यांच्या दालनांच्या सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. काही महिन्यांपूर्वीच या स्थायी समिती सभापतींच्या दालनांचे आणि मधल्या पॅसेजचे सुशोभीकरण करून सिलिंग करण्यात आले होते. मात्र, काल रात्री स्थायी समिती दालनासमोरील सिलिंग कोसळल्याने हे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामावर शंका व्यक्त केली जात आहे.
महापौर कार्यालयाच्या सुशोभिकरणासाठी 14 लाखांचे टेंडर अखेर रद्द
महापौर लिलाबाई आशान यांच्या दालनाच्या सुशोभिकारणासाठी 14 लाखांचे टेंडर 14 जुलै रोजी ऑनलाईन मागविण्यात आले होते. मात्र कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणे अनुचित असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी केला होता. त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्याने ही टेंडर प्रक्रियाचा प्रस्ताव बनविला त्याच्या विरोधात कारवाईची मागणी देखील कदम यांनी केली होती. यानंतर 16 जुलैला महापालिका प्रशासनाने तत्काळ ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.