मीरा-भाईंदर (ठाणे) -मिरा-भाईंदर शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मे. श्रुती इंटरप्राईजेस या खासगी ठेकेदाराने निविदा करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग केल्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकवे, अशी मागणी सभागृह नेता प्रशांत दळवी यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली आहे.
पाणी पुरवठा विभागामार्फत महापालिका हद्दीतील नागरीकांना आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. हे पाणी पुरवठा हा जलवाहिनी नसलेल्या इमारतींना तसेच जलवाहिन्यांच्या अंतिम टप्प्यातील कमी दाबाने पाणी पुरवठा होणाऱ्या इमारतींना व खासगी कार्यक्रमांना मागणी केल्यास महापालिकेमार्फत एक हजार रूपये प्रति फेरा इतका दर आकारून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येते. तर झोपडपट्टी परिसरात प्रति टँकर पाचशे रुपये शुल्क आकारण्यात येतो. यासाठी वार्षिक अंदाजित खर्च दोन कोटी रुपये असून यासाठी आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मे. श्रुती इंटरप्राईजेस कंपनीला या कामाची निविदा मंजूर करण्यात आलेली असून 585 रुपये या प्रति फेरा या दराने हे काम देण्यात आलेले आहे.
टाकीचा आतील भाग गंजल्याचा सभागृह नेत्याचा आरोप
मिरा-भाईंदर महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग आणि मे. श्रुती इंटरप्राईजेस यांच्यात झालेल्या करारनाम्यानुसार या कंपनीने पिण्याच्या पाण्याचा टँकर सुस्थितीत ठेवणे बंधनकारक आहे. टँकरच्या टाकीचा आतील भाग गंजलेला नसावा जेणेकरून टँकरमधील पिण्याचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक होणार नाही. पण, ठेकेदाराकडून पुरवठा करण्यात येत असलेल्या टँकर्सच्या टाक्यांचा आतील भाग गंजलेला आहे. यामुळे या टँकरमधील पाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून घातक ठरल्याचा आरोप सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी केला आहे.
ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन