ठाणे- लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला अवघे चार दिवस उरले असताना ठाण्यात महायुतीमध्ये फूट पडल्याचे समोर आले आहे. वारंवार अपमान झाल्याच्या भावनेतून रिपाइंने महायुतीचे उमेदवार राजन विचारेंचा विरोध करत महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
ठाण्यात आठवलेंच्या रिपाइंचा राष्ट्रवादीला पाठिंबा ठाण्यात आम्ही शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्याविरोधात आहोत तर, राष्ट्रवादीच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाआघाडीचे उमेदवार आनंद परंजपे यांना आमचा पाठिंबा आहे, असे रिपाइंचे ठाणे उपाध्यक्ष, संघटक आणि प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
वारंवार अपमानास्पद वागणूक मिळते, कोणत्याच बैठका, पत्रकार परिषद, चौक सभा यांना निमंत्रण दिलं जात नाही. वचननामा, प्रसिद्धी पत्रक यावर कुठेही रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, जिल्हाप्रमुख रामभाऊ तायडे यांचा फोटो लावला जात नाही. भाषणात ’जय भीम’ बोलले जात नाही. स्टेजवर मागे बसवून अपमान केला जातो, यामुळे आम्ही ही भूमिका घेत असल्याचे रिपाइंचे प्रवक्ते विकास चव्हाण यांनी सांगितले.
याबाबत रामदास आठवले, जिल्हाध्यक्ष यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी आम्हाला असे न करण्यास सांगितले. मात्र, आम्ही अपमान सहन करू शकत नाही. त्यामुळे कारवाई झाली तरी त्याला सामोरे जाऊ, पण राजन विचारे यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. राजन विचारे यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मान्य आहेत असे अजिबात वाटत नाही. गेली १० वर्षे बरोबर राहूनही यांच्या मनातील मनुवादी विचारधारा अजुनही गेलेली दिसत नाही. डोक्यातून अजुनही जातीयवाद गेलेला नाही. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करुन घेतले जात नाही, बैठकीत बोलवले जात नाही. पत्रकार परिषदेत ठाणे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांना तसेच नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथील जिल्हा अध्यक्षांना जाणीवपुर्वक मागे बसवून अपमान केला गेला. याबद्दल संतप्त कार्यकर्त्यांची समजूतही काढली नाही. यामुळे सतत मानहानी सहन का करायची असा निर्णय रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केला. कल्पतरु, हिरामण, लोढा या बिल्डरच्या १०० एकर जागेप्रकरणी भ्रष्टाचार करणार्या आणि जातीयवादी राजन विचारे यांच्याविरोधात प्रचार करण्यात येणार आहे. बहुजनांचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देत असल्याचे विकास चव्हाण यांनी सांगितले. जातीयवादी, भ्रष्टाचारी राजन विचारे यांना पाठिंबा देण्यापेक्षा पक्षकारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही विकास चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, रिपाइं कामगार अध्यक्ष विशाल ढेंगळे, रिपाई माथाडी अध्यक्ष विनोद भालेराव, अशोक कांबळे, रमेश पगारे, राम नाटेकर, राजू मोरे, बबन केदारे, विजय गायकवाड, लाड गायकवाड, रतन टाले व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.